Sunday, September 23, 2018

परी Chi Love Story ... [ Its Charcha Time ]

परी Chi Love Story ... [ Its Charcha Time ]
गावात परी-नामा प्रकरण जसं जसं गाजू लागलं, तसं परीच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नाच्या हालचाली वाढवल्या… तिला चुलत्यापासून पुन्हा आपल्या घरी नेण्यात आलं. तिकडे रोज तिच्या बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. यापूर्वी देखील परीसाठी बघण्याचे कार्यक्रम झाले. पण वराकडील मंडळी काहीना काही कारणास्तव परीचा प्रस्ताव नाकारत होते. त्यात हुंडा हा मोठा फॅक्टर होता. जो तो लाखोंच्या घरात हुंडा मागे आणि परीच लग्न काही केल्या जुळेना. पण यावेळी घरच्यांनी कितीही हुंडा द्यावा लागला तरी चालेल, या तयारीत स्थळ शोधायला सुरुवात केली. त्यामुळे तिसऱ्याच पोरानं परीला पसंत केलं. ते पोरग बँकेत कामाला होत.
त्यानं तब्बल ६ लाखांचा हुंडा आणि दारात लग्न लावून देण्याच्या अटींवर लग्नाला होकार दिला. परीला विचारण्याचा प्रश्न उरलाच नव्हता. घरच्यांनी जमीन विकून परीचा विवाह संपन्न करायचा घाट मांडला. पण परी हतबल होणारी नव्हती. ज्यादिवशी साखर पाण्याचा कार्यक्रम होता, त्याच दिवशी तिने आपण दुसऱ्यासोबत प्रेम करतोय हे सर्वांसमोर सांगितले. पाहुण्यांची तर भंबेरी उडाली. एका क्षणांत लग्न तर मोडलंच पण स्थळं येणही बंद झालं. साऱ्या कुटुंबाची थट्टा झाली. भावकीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेलीस म्हणून घरच्यांनी परीला बाहेर काढलं.
परीनं पुन्हा मामाचं गाव गाठलं. अपेक्षेप्रमाणे तिकडेही दूरच्या मामानं हात वर केले. त्यानंतर परी थेट सुमनच्या घरी पोहोचली. सुमनच्या घरच्यांनी परीला निवारा दिला. एवढंच नाही तिला ज्या मानसिक आधाराची गरज होती ती देखील दिली. सुमनचे वडील पंचायत समितीचे सदस्य होते. त्यांचा स्वत:चा प्रेम विवाह असल्यामुळे त्यानी परीच्या निर्णयाच स्वागत केलं. सुमनच्या वडिलांना गावातील सर्वच तात्या असं संबोंधायची. परी त्यांना म्हणाली तात्या तुम्हीच काही तरी मार्ग काढा यातून माझ खूप प्रेम आहे नाम्यावर. मला लग्न करायचं आहे. तात्यांनी तिला शब्दांत पकडलं. “अगं तुला लग्न करायचंय. पण त्याच काय? या सगळ्या प्रकारात त्याच्याकडील बाजू आतापर्यंत आमच्यासमोर आलीच नाही. तुम्ही एकमेकांना भेटत होता. याचा अर्थ दोघांच प्रेम होतं, हे बोलण्या इतपत ठीक आहे. पण पुढचा निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडून धाडसी निर्णयाची गरज आहे. तो पोरगा आयुष्यात आपल्या मामाच्या शब्दाबाहेर गेलेला नाही. आता तो तुझ्यासोबत लग्न करेल, हा तुझा विश्वास पुरेसा नाही. तर त्याने तसा सर्वांसमोर निर्णय घेणं गरजेच आहे. मी आज त्याला घरी बोलावलं आहे. बघू काय म्हणतोय.”
संध्याकाळी ५ च्या सुमारास नाम्या सुमनच्या घरी आला. तात्यानी परीला म्हटल्याप्रमाणे त्याच्यासोबत मामाही होता. आता मामाच्या समोर परीबरोबर लग्नाला हा होकार देणार का, हा मोठा प्रश्नच. नाम्या आणि त्याचा मामा बैठकीच्या खोलीत येऊन तात्यांची वाट पाहत बसले. सुमनने त्यांना चहा आणून दिला. “तात्या येतीलच एवढ्यात मागं गेल्यात बसा हं! परी आतच बसली होती. काहीवेळानंतर तात्या आले. “नामा कशी सुरु आहे डेअरी? सिरपा आणखी गाई वाढवतोय? या प्रश्नांनी तात्यांनी दोघांशी एकाच वेळी संवाद सुरु केला. सिरपा म्हणजे श्रीपाद नाम्याचा मामा. तात्या त्याल सिरपा असंच म्हणायचे. तात्यांच्या प्रश्नावर सिरपा म्हणाला, “तात्या प्रकरण टाकलंय. दहा गाईच केलं होतं. तुमची संस्था काय तेवढ्याला तयार होईना, त्यामुळं पाच गाईवरच समाधान मानाव लागतंय. तेबी आता कवा मंजूर करत्यात कुणास ठाऊक. तुम्ही लक्ष दिलं तर होईल लगेच.” तात्या मोठ्या तोऱ्यात म्हणाले
“आर तुझ्यावर लक्ष नाही द्यायचं तर मग कुणावर द्यायचं, करुन टाकू, पण हे सांग नाम्याच्या लग्नाबद्दल काय विचार केलायस?” म्हणजे मी तुला लय कोड्यात बोलत नाही. ती महाडकाच्या पोरीसोबत उडवून टाकूयात की बार! तात्यांच्या या शब्दावर श्रीपाद थोडा गोंधळला. अन् मग म्हणाला, “तात्या ज्यावेळी दोघांची गावभर चर्चा झाली त्याच वेळी मी तिच्या मामाशी यावर बोललो. पण त्यांनी साफ नकार दिला. जर त्यांना किंमत नसेल तर मी पोराकडची बाजू असताना कमीपणा का घेऊ. तात्या तुम्हीच सांगा? त्यानं माझी लायकी काढलेली हाय. त्यामुळे आत काही झालं तरी मी काय त्या पोरीला सून म्हणून स्वीकारणार नाही. नाम्यालाही मी तेच सांगितलंय. मी तुला वाढवलं असलं तरी तुझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार नाही. पण तिच्याशी लग्न केलसं. तर आमच्यासाठी तू मेलास! ” याचवेळी तात्यांनी परीला बाहेर बोलवलं. परी बैठक घरात येताच नाम्याच्या चेहरा फुलला. पण श्रीपाद मात्र खड्कन् उठून उभारला. तात्यांना त्यानं नमस्कार घातला आणि तिथून निघून गेला. नेहमी मामाच्या मागे जाणारा नामा मात्र शांतपणे बसून होता. खरं तर नाम्या परीशी लग्न करण्यास तयार आहे का? हा तात्यांच्या मनातील प्रश्न सुटला होता.
तात्यांनी दोन्ही कुटुंबियांना पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही कुटुंब आपल्या मतावर ठाम असल्याने तात्यांनी अखेर गावातील पाच पंचांच्या साक्षीनं दोघांचा विवाह लावून दिला. ज्या मंदिरातून परीनं प्रेमाचा अध्याय सुरु केला त्याच ठिकाणी प्रेमाचं नातं आता लग्नात बदलंल. नाम्याला तात्यांनी स्वत: जवळच्या पैशांनी गावातच दुसरी डेअरी काढून दिली. त्यानं चांगला जम बसवलाय. परी तात्यांची संस्थेत काम करते. दोघ मिळून उत्तमरित्या संसाराचा गाडा चालवतायत. नाम्याचा आता तो नामदेवराव झालाय. तात्या त्याच्या शब्दांवर दुधाच्या धंद्यात डोळे झाकून गुंतवणूक करतात. कारण त्यांना नामदेवच्या यशाबद्दल खात्री आहे. नुकताच सुमीचा साखरपूडा झाला. या कार्यक्रमात आलेला प्रत्येकजण नामदेव आणि परीची जोडा लक्ष वेधून घेत होता. एकूणच परीने अशिक्षितासोबत आयुष्य घालवण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला होता.
तात्यांच्या आशीर्वादाने ही जोडी चांगलीच फुलली. घरच्यांनी अजूनही दोघांना स्वीकारलेलं नाही. पण नामा आणि परीचा जोडा दृष्ट लागण्याजोगा आहे, अशीच चर्चा आज गावभर आहे. याच गावात काही दिवसांपूर्वी त्यांच्या रंगलेल्या प्रेमाला वेगवेगळे पद्धतीनं बदनाम केलं गेल. सुशिक्षित बेअक्कल असणारी पोरगी म्हणून परीला संबोधल गेलं. या येड्या गबाळ्यात त्या पोरीनं काय बघितलं असलं तर.. या चर्चा ऐकून नाम्याला स्वत:च्यात काहीतरी कमी असल्याचे टोमणे लग्नानंतरही सहन करावे लागले, पण दोघांनी एकमेकांना साथ देऊन दोघांविषयीचा विचार बदलायला भाग पाडलं. योग्य निर्णय, विश्वास आणि तात्यांच्या आशीर्वादाने त्यांचे प्रेम बहरले आहे. घरच्यांच्या विरोधान त्याचं प्रेम बिघडल नाही तर अधिक घट्ट झालंय दृष्ट लागण्याजोग सार घडतंय!

Love Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे… [ Its Charcha Time ]

Love Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे… [ Its Charcha Time ]


उसंड्या घेण्यास सदोदित उत्सुक अशा तिच्या मनाला सावर गं… म्हणावं असं कधीचं वाटलं नाही. कारण तिचं ते बिनधास्त वावरण, मनमोकळं बोलणं आणि शुल्लक कारणावर हलकसं हसणं हेच तिच्या सौदर्याचं खरं गुपित होत. पण म्हणतात ना ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ ही म्हण तिला अचूक लागू व्हायची. या परीचं हम दो हमारे दो… असं इनमिन चार माणसांच कुटुंब. इतर नातेवाईक आहेत पण ते नावालाच. हल्ली नातेवाईक हे समारंभापुरते असतात ना अगदी तशीच ही मंडळी. परीचा बाप मटका आणि बाईच्या नादात फसला आणि या छोट्या कुटुंबावर मोठी संकट यायला सुरूवात झाली. आईचं हाल बघतच दोन्हीं पोरं कशीबशी शिकली. परीचा मोठ्या भावाला आईनं इकड तिकडची ओढाताण करून मेडीकलला घातलं. पण परीचं आयुष्य कोमेजायला सुरूवात झाली.
बाप जेव्हा आईला ठेवणीतल्या शिव्या द्यायचा, तेव्हा वयात आलेली परी हैराण होऊन जायची. मग आईनं पोरीची डोकेदुखी दूर करण्यासाठी शिक्षणाच्या नावाखाली तिला दूरच्या नात्यातल्या मामाकडं धाडलं. पण तो माणूसही गेंड्याच्या कातडीचा निघाला. तो नेहमी परीच्या बिनधास्तपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात परीची अवस्था आगीतून उठून फूफाट्यात पडल्यासारखी झाली. पर्याय नसल्यानं आलिया भोगाशी या मंत्राचा जप करत परी काकांच्या चाळ्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा हसण्याचा प्रयत्न करु लागली. आभाळा एवढं दु:खसोबत घेऊन निघालेल्या परीला आता मानसिक आधाराची गरज वाटू लागली. आपलं कुणीतरी जीवा भावाचं असावं. आपल्या दोन गोष्टी त्यानं ऐकून घ्याव्यात. मनातील गोष्टी ओळखून आपल्याला काय हवं ते शोधण्याचा त्यानं प्रयत्न करावा, त्याच्या या धडपडीमुळे जीवन सार्थक झाल्याचा आनंद मिळावा, असे विचार तिच्या मनात घोळू लागले. कॉलेजातल्या मैत्रीणीच्या चाळ्यामुळे तिच्या मनातील इच्छा आणखी तीव्र व्हायच्या. पण कॉलेजात फिरताना तिला आपला राजकुमार काही दिसत नव्हता. कदाचित कॉलेजमध्ये आपण यासाठी येत नसल्याची जाणीव तिनं जिवंत ठेवली होती. मनात निर्माण होणाऱ्या या भावनेलाच प्रेम म्हणतात हे तिला कळत होतं. अर्थात परी प्रेमाच्या किनाऱ्यावर होती. मनात प्रेमाच्या लहरी तरंगत असताना बऱ्याचदा अधिक काळ संपर्कात असणाऱ्या व्यक्तीमध्ये माणूस न कळत गुंतत जातो. परीच्या बाबतीत अगदी असंच झालं. कॉलेजातून रोज घरी येताना नेहमी पारावर बसून असलेल्या नाम्या तिच्या मनात न कळत घर करु गेला.
आपण शोधत असणारा आधार नाम्या अर्थात नामदेवात तिला दिसायला लागला. साधा सरळ आणि शंभर नंबरी स्वभावाचा गडी. त्याच्या भोळ्याभाबड्या स्वभावामुळे त्यानं परीच्या ह्रदयात नकळत घर केलं. त्यानंतर नामदेव काय करतो? त्याला काय आवडतं? हे जाणून घेत त्याला आपलसं करण्यासाठी परीचा खटाटोप सुरु झाला. नाम्याबद्दल सांगायचं तर परी राहत असलेल्या ठिकाणापासून दोन गल्लीच्या अंतरावर नाम्या राहायचा. मधल्या आळीतल्या पारावर तो बऱ्याचदा बसलेला असायचा. त्याचं शिक्षण एसएससी चारवेळा नापास. सध्याचा उद्योग मामाच्या डेअरीवर कॅन उचलणे. पोशाख पाहिला तर तो दादा कोंडकेला आदर्श वगैरे मानत असल्याचा भास करुन देणारा. फरक एवढाच की नाम्या फुल पॅन्टमध्ये असायचा आणि त्या पॅन्टीला नाडीऐवजी सुधारित चेन नावाचा प्रकार असायचा. आता त्याच वर्णन ऐकल्यावर या यड्या गबाळ्याच्या प्रेमात एखादी पोरगी पडेल असं कुणालाच वाटणार नाही. पण परी त्याला अपवाद ठरली. त्याच कारण तिला आधाराची गरज होती, असे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला आपली आवड असते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे तिच्या प्रेमाचा कदाचित अपमान होणार नाही. दिवसागणिक परी त्याच्यात अधिक गुंतू लागली. हे गुंतणे म्हणजे सुरुवातीला फक्त त्याचा विचार करण्यापुरते मर्यादित होते.
मग तिने यातून थोडे पुढे सरकण्यासाठी गल्लीतल्या शाळेत जाणाऱ्या पोरांचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांना खाऊ देऊन ती त्यांच्याकडून नामदेवाबद्दल विचारपूस करु लागली. प्रत्यक्षात त्याला भेटावे, मनसोक्त बोलावे यासाठी तिची धडपड सुरु झाली. तिचा हा सर्व प्रकार तिच्या जीवलग मैत्रीण सुमनच्या लक्षात आला. ती तशी परीपेक्षा तीन एक वर्षांनी लहान. त्यामुळे परीला ती अक्का म्हणून हाक मारायची. पण दोघीं ऐकमेकींसोबत बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या. त्यामुळे एकेदिवशी सुमनने परीच्या डोक्यात भिरभिरणाऱ्या विषयाला हात घातला. “अक्का काय गं तू आज काल त्या डेअरीवाल्या नाम्यादाची लयच इचारपूस करत्यास. अगं त्यो तुझ्याएवढा नाय शिकल्याला. माझ्यासारीचं त्याची गाडी बी दहावीतच अडकल्या. म्या तर ऐकलंय की आई-बाप बी नाय त्याला. लहानाचा मोठा तो मामाबशीच झालाय. मामा राबराब राबवून घेतोय. एक बी शबूद न बोलता तो बिचारा राबतोय त्या डेअरीत. तू एवढी बीए का सी ए झालेली तुझ्या डोक्यात कसा काय बसला गं त्यो?” यावर आपल्याच धुंदीत परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. “सुमे तू अजून छोटी हाईस, तुला नाय समजायच. पण तुला त्याच्याबद्दल बरंच माहितंय गं? सुमनने नामदेवाचा नॉन स्टॉप पाढा वाचल्यावर परीने जीवलग मैत्रीकडूनच नाम्याला जाणून घेण्याचं ठरवलं. सुमननं नाम्याच गायलेलं गीत ऐकून परी चांगलीच सुखावली होती. कारण जीवलग मैत्रीणचं आपल्याला नाम्यापर्यंत पोहोचवेल, अशा प्रकारचा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला होता. मग सुमनकडनं तिला कळलं की नाम्या आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी डोंगराव असणाऱ्या महादेवाच्या मंदिराबाहेर दूध आणि बेलाची पान विकायला बसतो. परीला नाम्याला भेटीतील अडथळा दूर झाला.
देवावरुन विश्वास उठलेल्या परीनं नामदेवासाठी महादेवाला वारी सुरु केली. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून तिने आपलं व्रत सुरु केलं. आता व्रत म्हणजे उपवास वगैरे नव्हे; तर नाम्याला भेटण्यासाठी मोकळीक मिळावी म्हणून मनात केलेला निश्चय. सांस्कृतिक भान जपत भेटीची भूक मिटवण्यासाठी याशिवाय सुलभ मार्ग असू शकत नाही, या विचारातून परीने हा मार्ग निवडला. तास दीड तासांच्या अंतरावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात परी पहिल्यांदाच चालली होती. रस्त्याने अनेक बायका आरतीचे ताट घेऊन अंतर कापत होत्या. काही बायका थकवा दूर करण्यासाठी आराम करताना दिसत होत्या. सलग अर्धा तास चालल्यानंतर सुमनही थकली. पण परीच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा जाणवत नव्हता. मग काही वेळाने थकलेली सुमनच परीला म्हणाली, “अगं अक्का अजून तासभर चालायचं हाय, जरा इश्रांती घेवूया का? त्यो काय दिसंभर तितच असणार पळून नाय जायचा. बस थोडावेळ” यावर परीने तार्कीक उत्तर देत सुमनचा विश्रांतीचा डाव उधळून लावला.
परी म्हणाली “अगं सुमे त्यो पळून नाय जाणार गं! पण ऊन डोक्यावर यायच्या आत अंतर कापलं की, थकवा जाणवत नाही. म्हणून म्हणते चलं गुमानं….” परीच्या शब्दाला मान देत, सुमीनं आपला विश्रांतीचा विचार बदलला आणि परीसोबत अंतर कापण्यास सुरुवात केली. दीड एक तासानं दोघी टेकडीवर पोहोचल्या. परीच्या नजरा चोहूबाजूला नाम्याला शोधू लागल्या. पण नाम्या काही दिसेना. परीने डोळे मोठे करुन सुमीकडे पाहिले. सुमे अगं… त्यो तर दिसत नायं की कुठं? तो नाई आला ना तर सांगते तुला! अगं अक्का त्यो कट्टा दिसतोय का? तिथं त्याच साहित्य मांडलेल्या दिसतंय नव्हं. आलाय त्यो पण कुठतरी गेला असलं इकडं तिकडं येईल धीर धर थोडा. तोपर्यंत तरी शांत बस लागली लगेच डाबरायला. तुझ्यासाठी एवढं केलं तरी बी तुला काय आमची किंमतच नाय बघ!… तसं नाही गं सुमे… किंमत बिंमत काय काढते. तुझ्यामुळं तर माझ्यात हिमंत आलीया. पण तुला नाही तर मी कुणाला बोलणार सांग असं… अक्काच्या भावनिक उत्तरानं सुमीच्या गालावर पुन्हा हास्य फुलंल. कारण तिला माहिती होतं की, परीएवढं आपलुकीनं तिच्यासोबत कोणच वागत नाही. आता दोघीं नाम्याने मांडलेल्या दुकानासमोर बसल्या.
काहीवेळानंतर नाम्या दुकानावर आला. परीला आणि सुमीला आपल्या दुकानावर पाहून तो थक्क झाला. तो म्हणाला, “अरे सुमे एवढ्या सकाळी देवाला.” सुमीनं संधी साधत परीला तुला भेटायच होतं असं थेट सांगितले. सुमीचं हे वाक्य एकून नाम्या थोडा गोंधळला. मात्र त्याच्यापेक्षाही अधिक गोंधळ हा परीचा उडाला. नाम्याने तिच्याकडे एक नजर टाकली. नाम्यापासून ती साधारण तीन ते चार फूट अंतरावर उभी होती. सुमीचं बोलणं सुरुच होतं. “नाम्यादा अक्काला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायच हाय. गावात कसं भेटायचं म्हणून मीच म्हटल इथं भेटावं.” इतक्या वेळापासून आतूर झालेली परी आता मात्र निःशब्द झाली होती. ती फक्त एकटक नाम्याकडे बघत होती. नाम्याला काही कळायला मार्ग नव्हता, तो म्हणाला बोला की, काय बोलायच व्हतं. सुमनने परीला भानावर आणले. भानावर येत परी म्हणाली इथं रोज यतो का तू? नाम्या म्हटला, हे इचाराय इथंवर आलासा व्हयं! नाम्याचा आदराचा टोन पाहून परी त्याला म्हणाली आरे माझ्याशी आवजाव काय करतोस एकेरी नावाने बोल.
नाम्याच शिक्षण कमी असलं तरी व्यावहारिक ज्ञान चांगलं होतं. तो म्हणाला, “आहो तुम्ही आमच्यापेक्षा चार बुक जास्त वाचल्यात, तुम्हाला थोडं जास्ती जग कळतंय, मग तुमच्याशी आमची बरोबरी कशी होणार?” नाम्याला प्रत्युत्तर देत अखेर परीने निःशब्दता सोडली. तसं काही नसतं रे!.. तू सरळ नाव घे बोलेना! तो बरं तर म्हणाला पण परी म्हणण्याचं धाडस काय त्याला शेवटपर्यंत झालं नाही. दोघांना एकांत मिळावा म्हणून सुमन महादेवाचं दर्शन घ्यायला मंदिरात गेली. ती परत आली तरी खुसपूस तिला सुरुच दिसली. शेवटी वैतागून ती म्हणाली, अक्का मुद्द्याचा बोलली असशील तर निघायचं का? सकाळी आठला निघालोय आपण, आता चार वाजायला आल्यात. घरात समदी बोंबा मारत असतील!” तिघही निघू गं थांब जरा! नाम्याला गृहीत धरुन आत्मविश्वासान परीनं सुमनच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
या भेटीनंतर दोघांतील संवाद आणखी वाढला. दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोघे एकमेकांना सावरायला लागले. पण दोघांच्यात अजूनही आय लव्ह यू हा शब्दप्रयोग कुणीही वापरला नव्हता. कारण दोघांनाही त्याची गरज वाटली नव्हती. परीचं त्याच्यावरील प्रेम वाढत चाललं होत. तर नाम्याच्या मनात परीविषयी आपुलकी वाढत होती. परीसाठी हे पुरेसं होत. अर्थात परी सगळं दुःख विसरून प्रेमाच्या धुंदीत आनंदी आयुष्य जगू लागली. आईची मेहनत, भावाचे किस्से आणि बापाविषयी अजूनही मनात दाबून ठेलेला आदर ती नाम्यासमोर व्यक्त करु लागली. दोघांच्या प्रेमाची चर्चा आता गल्लीत सुरु झाली. परीच्या आनंद प्रकरणाचा प्रताप एकून तिची आई चांगलीच संतापली. पोरगीला शिकायला पाठवलं आणि तिने नाव बदनाम केलं, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. यामुळे ती परीला वाट्टेल ते बोलली, ‘तू थंड झाली असशील गं…आणि होत ही असशील अजून…चल आता तुझा इथला मुक्काम हलवं… आता तुला कुणाच्या तरी गळ्यात बांधते त्याशिवाय माझ चित्त थाऱ्यावर येणार नाही.
मायलेकीच्या वयात अन् विचारात अंतर असू शकते. पण यामुळे दोघीत दुरावा कधीच नसतो. पण मुलीसोबत आता लग्न कोण करणार हा तिच्या आईसमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न होता. आईच्या तोंडून अभद्र शब्द एकूनही परी ढळली नाही. ती निर्भीडपणे आईला म्हणाली आई, मला त्या नाम्याशी लग्न करायचयं देशील लावून. यावेळी चुलता आणि चुलती देखील तिथे आले होते. आतापर्यंत शांत बसलेलेली चुलती पटकन म्हणाली, “ये पोरी चार पुस्तक काय वाचलीस आणि तू आम्हाला सोयरिक जुळवायची अक्कल सांगायल्यास ? लग्न म्हणजे काय कालेजात दाखला घेण्याइतकं सोप काम आसतंय व्हय? काय माहिती आहे तुला त्या पोराबद्दल? आई-बाप नाहीत त्याला. मामाच्या घरात इज्जत नाही. आणि त्याला आम्ही जावई करायचं, ते बी तू सांगती म्हणून. डोक्यात जे खुळ भरलयंस ते काढून टाक ते अजिबात शक्य होणार नाही. हा सर्व प्रकार परीचा दाद्या फक्त शांतपणे एकत होता. त्याला कोणती भूमिका घ्यावी समजत नव्हते. विशेष म्हणजे परी जरी ठामपणे नाम्यासोबत लग्न करायला तयार असल्याचे सर्व नातेवाईकांसमोर सांगत असली तरी नाम्याची भूमिका नक्की काय हे कुणालाच माहिती नव्हती.

Happy Chocolate Day: माझिया प्रियाला प्रित कळेना… [ Its Charcha Time ]

Happy Chocolate Day: माझिया प्रियाला प्रित कळेना… [ Its Charcha Time ]


सनई चौघड्याचे सूर निनादत होते.. संपूर्ण हॉल माणसांनी भरुन गेला होता.. अमोघ अवघ्या काही वेळातच स्टेजवर येणार होता.. अनन्या स्टेजकडे डोळे लावून बसली होती.. आजूबाजूला सर्वत्र घाई गडबड सुरू असताना अनन्या भूतकाळात गेली.. अमोघ सोबतची पहिली भेट तिला आजही अगदी व्यवस्थित आठवत होती..
१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते.. भेटले म्हणण्यापेक्षा एकमेकांची नजराजनर झाली होती.. अमोघनं सिनियर कॉलेजला अॅडमिशन घेतलं होतं.. वर्ग शोधता शोधता उशीर झाल्यामुळे पहिल्याच दिवशी उशीर झाला होता.. अनन्या अकरावी,
बारावीलादेखील त्याच कॉलेजला असल्यानं तिला संपूर्ण कॉलेज ओळखीचं होतं.. अनन्या पहिल्या बेंचवरच बसली होती.. तितक्यात ‘मे आय कमिंग…’ असं विचारत अमोघ वर्गात आला.. काहीसा गोंधळलेला अमोघचा चेहरा अनन्याच्या कायम लक्षात राहिला.. पुढच्या बेंचवर जागा नसल्याने अमोघ मागे जाऊन बसला.. जाताना अमोघ आणि अनन्याची नजरानजर झाली..
पुढे एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये असल्याने अमोघ आणि अनन्याची ओळख झाली.. अनन्या दिसायला सुंदर.. सडपातळ बांधा.. मध्यम उंची.. जीन्स टॉप घालणारी.. फारशी फॅशन नाही.. मात्र चारचौघीत उठून दिसणारी.. मेक अप न करताही अतिशय सुंदर दिसणारी.. अमोघही तसा साधा.. फारशी फॅशन नाही.. आपण कॉलेजमध्ये अभ्यास करायला येतो.. कोणाला इम्प्रेस करायला नाही, या विचारांचा अमोघ कायम जीन्स आणि शर्टमध्ये कॉलेजमध्ये यायचा.. मात्र एकदा अमोघने प्रिंट असलेला टी शर्ट घातला होता आणि तेव्हापासूनच अमोघ आणि अनन्या एकमेकांशी बोलायला लागले..
‘ए हा टी-शर्ट छान आहे.. तू जनरली नाही घालत ना टी-शर्ट?’ अनघा म्हणाली.. यातून ती अमोघला ऑब्जर्व्ह करते हे कळून येत होतं.. मात्र ते अमोघच्या लक्षात आलं नाही..
‘फारसे नाहीयत टी-शर्ट.. हे टी-शर्ट मित्रांनी प्रिंट केलंय.. त्यावरचं वाक्यदेखील त्यांचंच आहे.. म्हणून घातलंय..’ अमोघचं उत्तर ऐकताच अनन्या त्याच्या टी-शर्टवरचं वाक्य वाचू लागली..
‘काय लिहिलंय..? गैरसमज हे मॅगीसारखे असतात.. लगेच होतात.. अमोघ हे भारी आहे..’ अनघाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं..
‘आपले मित्रच भारी आहेत..’ अमोघ म्हणाला.. मात्र का कुणास ठाऊक त्यापुढे तो काहीच बोलला नाही..
एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये असल्याने अमोघ आणि अनन्या अनेकदा सोबत असायचे.. अमोघ तसा हुशार होता.. नवनव्या संकल्पना त्याला अगदी पटकन सुचायच्या.. त्याचं कम्युनिकेशन स्किल अगदी उत्तम होतं.. त्यामुळे अमोघ म्हणजे वर्गातलं एक स्मार्ट व्यक्तिमत्त्व होतं.. शिक्षक त्याला अगदी व्यवस्थित ओळखायचे.. मात्र प्रेजेंटेशनच्यावेळी न अडखळता, सलग बोलणारा अमोघ इतरवेळी गप्प असायचा.. लेक्चर्स झाली, प्रोजेक्ट डिस्कशन संपली की अमोघ लगेच घरी जायला निघायचा.. त्यामुळे अमोघ नेमका कसा आहे, कोणता अमोघ खरा आहे, असे प्रश्न अनन्याला पडायचे.. एक दिवस असाच अमोघ घरी जायला निघाला होता.. तेवढ्यात अनन्या अमोघच्या समोर आली..
‘घरी निघालायस?’ अनन्याने संवाद सुरू केला..
‘हो’, एकाच शब्दात अमोघने उत्तर दिलं..
‘तू बोरिवलीला राहतोस ना..?’ अनन्याने संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला..
‘हो..’ अमोघने कमीतकमी संवाद होईल, याची काळजी घेतली..
‘मी पण बोरिवलीला राहते.. तू ट्रेननेच जाणार ना? चल ना आपण सोबत जाऊ..’ अनन्या नेहमीप्रमाणे हसत म्हणाली.. अमोघ शांत होता..
‘तुला नाही चालणार का? नको जाऊया का सोबत?’ अनन्याने शांतपणे विचारलं..
‘ठिक आहे.. चल..’ अमोघ म्हणाला.. अमोघ आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र प्रवास करणार होते.. मात्र प्रवासातदेखील अमोघ फारसं बोलला नाही.. मात्र अमोघच्या आयडीवरुन तो दोन वर्षे मोठा असल्याचं अनन्याला समजलं होतं.. मात्र इतका हुशार मुलगा दोन वर्षे नापास होईल, यावर अनन्याचा विश्वास बसत नव्हता.. मात्र अमोघचा अबोल स्वभाव पाहता तो इतक्या लवकर काही सांगेल, असं अनन्याला वाटत नव्हतं.. ट्रेनमध्येही अमोघ शांतच होता.. अनन्या अधे मधे बोलत होती.. अमोघ त्या प्रश्नांची मोजक्या शब्दांमध्ये उत्तरं देत होता..
अमोघचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे एव्हाना अनन्याच्या लक्षात आलं होतं.. कॉलेज प्रोजेक्ट, प्रेजेंटेशन्सवेळी व्यवस्थित बोलणारा अमोघ हाच का, असा प्रश्न पडावा, इतका तो शांत होता.. अनन्या दररोज अमोघसोबतच ट्रेनने बोरिवलीपर्यंत यायची.. ते एकाच परिसरात राहात होते.. थोड्या दिवसांनी ते एकत्रच कॉलेजला जाऊ लागले..
‘अमोघ तू दोन वर्षांनी मोठा आहेस ना..? एक दिवस अनन्याने कॉलेजला जाताना न राहवून विचारलं..
‘तुला कसं समजलं..?’ अमोघच्या चेहऱ्यावर प्रश्न होता..
‘अमोघ, आपल्या आयडीवर बर्थ डेट असते.. आणि तू शहाण्या बाळासारखं ते आयडी नेहमी घालतोस.. त्यामुळे समजलं..’ अनन्यानं वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न केला..
‘अच्छा.. बरोबर आहे..’ अमोघने मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले..
‘नेमकं काय झालं होतं? काही मेजर प्रॉब्लेम आहे का?’ अनन्याने आस्थेवाईकपणे विचारलं..
‘थोडे प्रॉब्लेम झाले होते.. त्यामुळे दोन वर्षे वाया गेली.. पण कधी कधी चांगलंच असतं ना.. कोण आपलं कोण परकं ते कळतं.. वाईट दिवस आल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..’ अमोघ व्यक्त होत होता.. नेहमी अगदी मोजक्या शब्दांमध्ये बोलणारा अमोघ पहिल्यांदा मोकळा होत होता..
‘नेमकं काय झालं दोन वर्षांत अमोघ?’ अनन्याने प्रेमळपणे विचारले.. इतका आपलेपणा अमोघने दोन वर्षांमध्ये एकदाही अनुभवला नव्हता..
‘बरंच काही.. दोन वर्षांपूर्वी सर्वकाही होतं.. एक हसरं कुटुंब.. खूप मित्र.. त्यांच्यासोबत धम्माल.. दहावीला चांगले मार्क्स मिळाले होते.. इंजिनियरिंग करायचं होतं.. म्हणून सायन्सला अॅडमिशन घेतलं.. तिथेही छान मित्र मिळाले.. सर्वकाही सुरळीत सुरू होतं.. मात्र त्यानंतर आयुष्य इतक्या वेगानं बदललं.. सूर्याच्या लख्ख प्रकाशात चालताना अचानक सूर्य, त्याचा प्रकाश सर्वकाही लुप्त व्हावं आणि पुढची वाट अंधारुन जावी, असं वाटू लागलं.. आई-बाबा वेगळे झाले.. त्यामुळे माझं लक्ष कशातच लागेना.. मित्रही दुरावले.. इतका खचलो की
इंजिनियरिंग जमेल असं वाटतं नव्हतं.. सायन्स कठीण जाऊ लागलं.. तिथे इंजिनियरिंग काय जमणार? अॅडमिशन तरी मिळेल का? असं वाटू लागलं आणि म्हणून बारावीनंतर बीएमएमला अॅडमिशन घेतलं..’ अमोघ रिता झाला होता.. मनात साठवून ठेवलेलं सर्वकाही बाहेर आलं होतं..
एका व्यक्तीचं आयुष्य इतक्या कमी वेळात असं बदलू शकतं, याची कल्पनादेखील अनन्याने केली नव्हती.. अनन्यानं अमोघचं डोकं खांद्यावर ठेवलं.. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले.. अमोघ व्यक्त झाला, त्यानं मन मोकळं केलं, त्यामुळे अनन्याला बरं वाटत होतं.. अमोघची मनःस्थितीदेखील काहीशी तशीच होती..
आयुष्यात घडलेल्या त्या घटनांनंतर अमोघने मैत्री वगैरे करणं बंद केलं होतं.. इंजिनियरिंग करता आलं नाही.. मात्र आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर अॅडव्हर्टायझिंगमध्ये चांगलं करिअर करायचं त्यानं ठरवलं होतं.. आता अनन्यादेखील सोबत होती.. अनन्या मोकळ्या स्वभावाची होती, तरी तिच्या आसपास मित्रमैत्रिणींचा गोतावळा नव्हता.. प्रोजेक्ट ग्रुप सोडला तर ती फारशी कुणाशी बोलायची नाही.. कायम आनंदी असायची.. मात्र त्यासाठी कोणी सोबत असायला हवं, असं काही नव्हतं.. मात्र आता अमोघ कायम तिच्यासोबत असायचा.. त्या दोघांना एकमेकांचा सहवास आवडायचा..
‘अमोघ तुला फोटोग्राफी आवडते ना?’ एकदा सहज कॉलेजमधून घरी जाता जाता अनन्यानं विचारलं..
‘हो.. पण हे तुला कसं कळलं..? हे मी आयडी कार्डवर लिहिलेलं नाही..’ गमतीच्या स्वरात अमोघ म्हणाला..
‘अरे, तुझं फेसबुक प्रोफाईल चेक केलं.. थोडे जुने फोटो पाहिले.. त्यावरुन कळलं..’ अनन्या म्हणाली..
‘अच्छा.. फेसबुक प्रोफाईल पण चेक करुन झालंय का..?’ अमोघनं उत्तर दिलं..
‘हो.. केलं मी चेक.. तू इतका कमी बोलतोस की मला असा शोध घ्यावा लागतो.. तू कायम मनमोकळेपणाने बोलत जा माझ्यासोबत.. मित्र दुरावले म्हणून माझ्यासोबत असं वागणार का? मी नाही जाणार तुला सोडून..’ अनन्याच्या बोलण्यात विश्वास होता.. तिच्या मनातली भावना तिनं अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली होती..
‘हो मला फोटोग्राफी आवडते.. जायचंय का कुठे बाहेर फोटोग्राफीला?’ अमोघने अनन्याला थेट मुद्यावर आणलं..
‘हो.. जाऊ या ना.. नॅशनल पार्क.. दोघांना जवळ आहे..’ अनन्याने पर्याय सुचवला..
दोन वर्षांपासून प्रचंड डिप्रेशनमध्ये असणारा अमोघ नॉर्मल होऊ लागला होता.. स्वत:कडे लक्ष देऊ लागला होता.. फोटोग्राफी पुन्हा सुरू झाली होती.. हे सर्व पाहून अमोघच्या आईला प्रचंड आनंद झाला होता.. तिलादेखील जगण्याचं बळ मिळालं होतं.. अमोघच्या बोलण्यात वारंवार अनन्याचा उल्लेख असायचा.. त्यामुळे याच मुलीमुळे अमोघ पुन्हा जिद्दीने उभा राहिला आहे, हे अमोघच्या आईला समजलं होतं.. अनन्या बऱ्याचदा घरीदेखील यायची.. मनमिळाऊ स्वभावाची अनन्या अमोघच्या आईला खूप आवडली..
हळूहळू दिवस पुढे सरकू लागले.. अमोघ आणि अनन्याची मैत्री आणखी घट्ट होत गेली.. कॉलेजमधल्या अनेकांना त्या दोघांचं अफेअर सुरू आहे, असं वाटू लागलं.. दिवसाची सुरूवात एकत्र ते अगदी रात्रीच्या जेवणानंतर वॉक असा दिनक्रम सुरू होता.. सुरुवातीला अबोल असलेला अमोघ आता छान बोलायचा.. गप्पा मारायचा.. अनन्या आणि अमोघ एकमेकांचे सर्व काही झाले होते.. आता तर अमोघच्या चेहऱ्याकडे पाहूनदेखील अनन्याला सर्व समजायचं.. आणि अनन्याच्या आवाजातला चढउतार अमोघला सर्व सांगून जायचा.. अमोघ आणि अनन्या एकमेकांच्या खूप जवळ आले होते..
‘अनन्या, ए अनन्या.. चल लवकर स्टेजवर.. अमोघ आला..’ अनन्याची आई हाका मारत होती.. अनन्या अचानक भानावर आली.. अमोघ खरोखरच स्टेजवर आला होता.. फ्लॅशबॅकमध्ये हरवून गेलेली अनन्या स्टेजवर गेली.. अमोघची आईदेखील स्टेजवर होती.. हॉलमध्ये अक्षता वाटल्या जात होत्या.. अमोघच्या आईला पाहताच अनन्या त्यांच्याजवळ गेली.. गेल्या ५ वर्षांपासून घरी येणं जाणं असल्यामुळे अमोघची आई कधीच अनन्याची आई झाली होती.. अमोघच्या आईजवळ गेल्यावर अनन्याला अश्रू अनावर झाले होते..
‘काकी, मला तुमची सून व्हायला खूप आवडलं असतं..’ हे एकच वाक्य अनन्या अमोघच्या आईच्या कानात म्हणाली होती.. अमोघच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.. आई आणि अनन्याकडे पाहात असलेल्या अमोघला नेमकं काय झालंय हे समजलं होतं.. अनन्या स्टेजवरुन उतरुन निघून जात होती.. एक चांगला मित्र आणि मैत्रीण गमावू नये, यासाठी कायम शांत राहल्याने अमोघ आणि अनन्याने आयुष्याचा जोडीदार गमावला होता..

Valentine’s Week 2018 : पूल… एक स्ट्रेंज कथा [ Its Charcha Time ]

Valentine’s Week 2018 : पूल… एक स्ट्रेंज कथा [ Its Charcha Time ]
सावी, अॅडव्हर्टायजिंग एजन्सीमध्ये गेल्या वर्षभरापासून काम करतेय. या क्षेत्रात येण्याचा तिचा निर्णय घरातल्यांना काही पटला नव्हता. पण, सतत ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करणाऱ्या या पठ्ठीने तिच्या करिअरचा मार्ग आधीच निवडला होता. लास्ट इयरलाच तिची ओळख नीलशी झाली. कॉलेज फेस्टिव्हलमध्ये व्हाया-व्हाया सुरू झालेली त्यांची ओळख इतकी घट्ट झाली की, प्रेमाच्या आणाभाका आणि रिलेशनशिप या साऱ्याची खिल्ली उडवणारी सावी आता नीलसोबतच्या नात्याचा गांभीर्याने विचार करत होती. पण, “मला काही रिलेशनशिप वगैरे नकोय.”, असं म्हणत नील नेहमीच त्यातून अंग काढत होता.
त्या दिवशी अशीच एका कॅफेमध्ये त्यांची भेट झाली आणि सावीने त्यानंतर नीलच्या घरी जाण्याचा हट्ट धरला. नीलही तिला नकार देऊ शकला नाही. घरी पोहोचताच काही वेळेच्या शांततेनंतर सावीनेच विषय काढला.
“नील… लिसन टू मी”
“हम्म से…” तो नुसतच उत्तरला.
त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. सावीने त्याच्या हातातून मोबाईल काढला आणि म्हणाली,
“सी आय थिंक, अब हमे रिलेशनशिप के फ्युचर के बारे मे सोचना चाहिये.”
“सावी नॉट अगेन, अॅज आय सेड धीस इज नॉट माय कप ऑफ टी. मला बंधनं नकोयत.”, नील ताडकन बोलून गेला.
“नील, आय अॅम नॉट अ पपेट. तुला वाटेल तेव्हा तू युज करुन मला विसरुन जाणार. चार, चार दिवस आपण बोलतही नाही. पाचव्या दिवशी तुझं प्रेम जागं होतं. धीस इज नॉट द वे.”,
सावीच्या रागाचा पारा आणि भावनांचा बांध आता फुटला होता. त्यांचं नातं सगळ्या बाजूने चांगलं होतं. अगदी इन्टिमसीपासून कशाचाच अभाव नव्हता. पण, फक्त त्यात कमिटमेंट बाजूला सरली होती.
तिच्या “धीस इज नॉ द वे..” म्हणण्यावर नीलने तिला मागे ढकलत,
“सो चेंज युवर वे. वी आर नो मोर टुगेदर सावी”, असं म्हणत आवाज चढवला.
“मी आधीच सांगितलेलं की मला नात्यात अडकायचं नाहीये. तेव्हा तुझी काहीच हरकत नव्हती. कम-ऑन आपण ज्या फिल्डमध्ये वावरतोय. ज्या जगात वावरतोय. तिथं नात्यांची डेफिनेशन बदललीये सावी”, असं म्हणत त्यानं थेट तिला दाराकडचा रस्ता दाखवला.
फार काही गयावया न करता,
“यू आर अ जर्क” असं म्हणत ती ताडकन निघाली.
तितक्यात
“अॅण्ड वन मोर थिंग सावी”, असं नील म्हणाला तेव्हा ती थांबली आणि मागे वळली, त्यावर
“थँक्स फॉर एव्हरिथिंग”, असं तो म्हणाला आणि आतल्या खोलीत निघून गेला. तिच्या असण्या-नसण्याने त्याला काही फरक पडत नव्हता हे गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या वागण्यातून स्पष्ट होत होतच. हे सर्व इतक्या वेगाने झालं की, दुसऱ्या दिवशी सावीचा वाढदिवस होता हे खुद्द तीसुद्धा विसरली होती.
भावनाविवश झालेली सावी मुंबईत एकटीच राहात असल्यामुळे घरी येऊन रडत बसण्यापेक्षा तिने दडवून ठेललेल्या त्या रमचा आधार घेतला. काय करावं हे तिला कळतच नव्हतं. दुसऱ्या दिवशी भणभणलेल्या डोक्यानेच ती ऑफिसाठी तयार होत होती इतक्यात फेसबुकवरचा मेसेज पॉप अप झाला.
“हॅप्पी बर्थ़डे सावी”. तो तिच्या बॉसचा मेसेज होता.
“वाव.. इट्स माय बर्थडे…” असं म्हणत ती मिश्किलपणे हसली आणि बॅग उचलून निघाली.
ऑफिसमध्ये आल्यावर नेहमी सर्वांना ग्रीट करणारी सिनियर काँटेंट रायटर सावी आज हंटरवाली झाली होती.
“सखा….ये टेबल क्लीन करो”, असं तिने ऑफिसबॉयला दरडावून सांगितलं.
एक्सटेंन्शनवरुन कॉल करत तिने पाखीला बोलावून घेतलं. पाखी सावीची ज्युनियर.
“पाखी व्हेअर इज माय स्टेशनरी? किसने कहा था मेरे डेस्क को हाथ लगाने. डोन्ट यू अन्डरस्टॅण्ड मेरे डेस्कपे इन्टर्न्स को मत बिठाना. बोला था मैने.” ती अक्षरशः ओरडत होती.
इथे मागच्या रांगेत बसलेल्यांमध्ये तिच्या वागण्याचं गॉसिप सुरु झालेलं.
“ये हंटरवाली क्यो बनी है आज…? लगता हे नील ने ढील दिया…”, असं पार्थ पटकन म्हणाला. त्या दिवशी संध्याकाळी ती वेळेपेक्षा जरा लवकरच निघाली. अर्थात वाढदिवस होता म्हणून गेली असावी असं सर्वांना वाटलं. पण तिच्या आणि नीलच्या नात्यात आलेल्या या वळणाची कोणाला कल्पना नव्हती. त्या दिवशी सावी ओलाने न जाता चक्क ट्रेनने निघाली होती. कधी तिने ट्रेनने प्रवास केला तरीही फर्स्ट क्लासने प्रवास करणारी ती आज थेट कॉमन लेडीज कंपार्टमेटंमधून गेली.
“पुढील स्टेशन ठाणे…”, असं ती ट्रेनमधील कधीही न थकणारी आणि कधीही न दिसणारी बाई बोलून गेली. सावी ट्रेनमधून उतरली. स्टेशनवर तुडूंब गर्दी तर होतीच. पण, त्यातूनच वाट काढत तिने पूलाचा रस्ता धरला. एकमेकांचे धक्के लागत होते. काही कळतच नव्हतं. पाय न उचलताही ती पुढे जात होती. एका जिन्यावरुन गर्दीचा जो लोट आला, संपूर्ण पूलावर गोंधळ झाला. हे रोजचं होतं. पण, सावीसाठी मात्रं नवीनच होतं.
तिच्या मागे असणाऱ्या त्या मुलाने “सॉरी आय कान्ट हेल्प इट” असं म्हणत आधीच धक्का लागू शकतो अशी पूर्वकल्पना दिली. त्यामुळे तीसुद्धा शांत राहिली.
“नो इश्यू…” ती म्हणाली.
गर्दी अंगावर येऊ लागलेली. कसाबसा तो पूल पार झाला. दुसऱ्या दिवशीही तेच…. ऑफिसमधली चिडचीड त्यानंतर ट्रेनचा प्रवास आणि त्या दिवशीही पूलावरची ती गर्दी… पण, त्या दिवशीची गर्दी मात्र काहीशी वेगळी होती. का कोण जाणे. आजही सावी पूलावर चढली तेव्हा गर्दीला लोट आला…. आज तो कालचा मुलगा पायऱ्यांपासूनच सावीच्या मागे होता. अर्थात त्याचा काहीच हेतू नव्हता. मुळात त्याचं सावीकडेही लक्ष नव्हतं. हे तर डिटेक्टिव्ह सावीच्या लक्षात आलं होतं. आज जरा जास्तच गर्दी होती हे सुद्धा सावीला जाणवलं. ती शांतपणे गाणी ऐकत- ऐकत ब्रिज चढत होती. आज त्या मागच्या व्यक्तीने सावीला एक प्रकारे दोन्ही हातांनी कव्हर केलं होतं… अर्थात गर्दीमुळेच असावं ते.
“हुश्श…” सरतेशेवटी पूल संपला आणि ते दोघंही आपापल्या वाटांना निघून गेले. कोण होता तो… असा पुसटसा प्रश्न तिच्या मनात आला पण, लेट इट बी… असं म्हणत तिने तो विषय स्टेशनच्या पायरीवरच सोडला.
(पू्र्वार्ध)

Love Diaries : आजही तिची आठवण येते… [ Its Charcha Time ]

Love Diaries : आजही तिची आठवण येते… [ Its Charcha Time ]

आज प्रसेन वाफाळलेला चहा आणि कागद पेन घेऊन खूप दिवसांनी बसला होता. घरच्यांसाठी तो त्याच्या खोलीत काही तरी लिहित बसला होता, पण त्याच्यासाठी ते फक्त लिखाणं नव्हतं. मनात चाललेला कोलाहल शांत करण्याचं त्याच्याकडे असलेलं ते एकमेव माध्यम होतं. वेगवेगळ्या विषयांवरच्या डॉक्युमेंट्री पाहणं, मित्रांना एकत्र घेऊन शॉर्ट फिल्म्स करणं यात तो रमायचा. एकदा का शॉर्ट फिल्म करण्याचे विचार त्याच्या मनात सुरू झाले की मग बाकीच्या विचारांना त्याच्या मनात फारसं स्थान नसायचं. नोकरी ही फक्त पैसा कमवण्याचं एक माध्यम आहे त्याचा खरा आनंद लिखाण, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स यातच दडलेला होता.प्रसेनच्या बहिणी त्याला अनेकदा विचारायच्याही की या सगळ्या गोष्टींचा तुला फायदा काय होतो. यावर त्याच्याकडे ठराविक असं उत्तर कधीच नसायचं. पण त्याला याची पूर्ण जाणीव होती की काही गोष्टी या जगण्यासाठी करायच्या असतात, तर काही गोष्टी जगणं सुकर करतात. तो करत असलेली नोकरी त्याचं आयुष्य सुकर करत होती. मात्र त्याच्या या छंदामुळे तो खरा जगत होता. नेहमीच हॅपी गो लकी असणारा प्रसेन आज मात्र थोडा खिन्न होता.
नकोसा वाटणारा भूतकाळ अचानक समोर आल्यावर माणूस जसा बैचेन होतो तसंच काहीसं प्रसेनच्याबाबतीत आज घडलं होतं. आज ऑफिसमधून घरी येताना त्याला खूप वर्षांनी शाळेतला एक मित्र सौरभ भेटला होता. शाळेत असताना प्रसेन आणि सौरभ अगदी जिगरी दोस्त… इतक्या वर्षांनी सौरभला पाहून प्रसेन सुरूवातीला थोडा सुखावला. पण जसजशा त्यांच्या गप्पा रंगू लागल्या तसा प्रसेनला सौरभला भेटल्याचा आनंद ओसरू लागला.
प्रसेनचं शिक्षण बॉईज स्कूलमधलं. त्यामुळे अर्थातच तिथल्या प्रत्येक मुलाला मुलींबद्दलचं कुतूहल होतंच. त्याला प्रसेनही काही वेगळा नव्हता. आपल्या शाळेतल्या जुन्या आठवणींना सौरभ उजाळा देत होता. ‘तेव्हा आपण कसे होतो यार…किती अफलातून गोष्टी केल्या आपण…’ आजही आपले शिक्षक आपल्या नावाने धसका घेत असतील. प्रसेननेही तोवर आपल्या शाळेतल्या दोन तीन आठवणींना उजाळा दिला होता.
काहीही बोल पण प्रसेन तू तेव्हा फारच अबोल होतास आणि घाबरटही.. प्रसेनला सौरभचं दुसरं वाक्य फारसं पटलं नाही. मी मान्य करतो की मी अबोल होतो पण प्लीज मी काही घाबरट वगैरे नव्हतो. घाबरट होतास म्हणून तर तुला त्या क्लासमधल्या मुलीला प्रपोज करायला सांगितलं होतं. आठवतंय ना… आपली तशी पैजही लागली होती. हो आठवतंय ना चांगलंच आठवतंय… तीन मुलींपैकी जी त्यातल्या त्यात सामान्य मुलगी असेल आणि जी सहज मला हो बोलेल अशाच मुलीला आपण हेरलं होतं. ‘तिचं नाव काय होतं रे?’ सौरभने अगदी सहज प्रश्न विचारला. प्रसेनने मोठा उसासा टाकत रुपाली असं उत्तर दिलं. प्रसेनच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सौरभच्या नजरेतून काही सुटले नाहीत. कदाचित आपण प्रसेनच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळलं असं त्याला थोडा वेळ वाटलं पण प्रसेनने लगेच विषय बदलत ते जाऊ दे बाकी बोल.. जॉब कसा सुरू आहे? काय करतोस सध्या? लग्न वैगेरे काही केलंस की नाही? अशा भूतकाळातून वास्तवाकडे आणणाऱ्या प्रश्नांचा भडीमार केला.
प्रसेनचा स्वभाव तसा समजायला कठीण होता. वरकरणी उत्साही, आनंदी वाटणारा प्रसेन आतून समजायला तेवढाच कठीण होता. असं असलं तरी व्यक्तिमत्वाचे दोन मुखवटे घेऊन तो कधी फिरला नाही. जे आहे ते समोर आहे याच मताने त्याला त्या त्या वेळी जे योग्य वाटलं त्याने ते केलं. काहीवेळा यशस्वी झाला तर काही वेळा अयशस्वी. पण आपल्या प्रत्येक चुकांमधून तो शिकत गेला. रुपालीसोबत केलेली चूकही त्याला फार वर्षांनंतर कळली. सौरभशी वरकरणी गप्पा मारुन झाल्यावर पुन्हा कधीतरी निवांत भेटू या प्रॉमिसवर दोघंही आपआपल्या घरी जायला निघाले.
प्रसेन घरी आला आणि त्याने सरळ आईला चहा द्यायला सांगितला. आईचा चहा होईपर्यंत तो स्वतःचं आवरून बसला होता. हातात खूप दिवसांनी कागद- पेन घेतलं होतं. आज त्याच्या मनात पुन्हा एकदा खूप काही भरुन आलं होतं जे त्याला कागदावर उतरवायचं होतं. रुपालीचा विषय अगदी सहज निघाला खरा, पण त्यामुळे भूतकाळातल्या अनेक व्यक्ती, परिस्थिती आणि जीवघेणे विचार मनात फेर धरू लागले होते.
रुपाली आणि प्रसेन दोघंही समवयस्कर. शाळेतल्या मित्रांसोबत लागलेल्या पैजेमुळे त्याने जोशात येऊन रुपालीला प्रपोज केलं होतं. रुपालीसाठी मात्र ते पहिलं प्रेम होतं. आपल्याला कोणीतरी प्रपोज केलं या भावनेनेच ती सुखावली होती. त्या अल्लड वयात काय चूक काय बरोबर याची फारशी माहिती नसते आणि माहिती असले तरी त्याची पर्वा कोणीही करत नाही. प्रसेनच्या बाबतीतही काहीसं असंच झालं. मित्रासोबत लावलेल्या पैजेची झिंग इतकी होती की त्याने दुसरा काही विचार केलाच नाही. रुपालीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार त्याचक्षणी केला होता. पण प्रसेनच्या आयुष्यातली अडचण त्यामुळे वाढली होती. मुलीला प्रपोज करेपर्यंतचीच पैज लागल्यामुळे आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. त्याचे रुपालीवर प्रेम नव्हतेच. पण तिला हा सगळा प्रकार सांगितला तर वाईट वाटेल या विचाराने त्याने काही दिवस जाऊ दिले. या दिवसांमध्ये तो तिला कधी फोन करायचा तर कधी रुपालीच त्याला फोन करायची. रुपाली जेव्हा प्रसेनला भेटण्यासाठी बोलवायची तेव्हा तो काही ना काही कारण सांगून भेटणं टाळायचा. काही दिवस रुपालीला तो खरंच अभ्यासात बिझी असेल असे वाटले पण नंतर मात्र तो तिला टाळत असल्याचे तिच्या लक्षात आले. एक दिवस रुपालीने त्याला भेटून तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? असा थेट प्रश्न विचारला. यावेळी मात्र प्रसेनने खरे सांगायचे ठरवले आणि त्याने रुपालीला जे आतापर्यंत घडले ते सर्व सांगितले.
प्रसेनकडून त्या सर्व गोष्टी ऐकताना रुपालीच्या पायाखालची जमीन हलत होती. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केले, त्याचे आपल्यावर कधीच प्रेम नव्हते. या विचारानेच तिला घेरी आली. प्रसेनने घडल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्यानंतर आजतागायत ते दोघं एकमेकांना कधीच भेटले नाही.
शाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बी.कॉमच्या फर्स्ट इयरला असताना उनाड मुलांच्या यादीत प्रसेनचं नाव अग्रणी होतं. कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये सुतळी बॉम्ब ठेवणे, एकाचवेळी दोन- तीन ठिकाणी सुतळी बॉम्ब लावणे, रस्त्यावर स्टंट करणे, कॉलेज कॅम्पसमध्ये मारामारी करणे यासाठीच प्रसेन ओळखला जायचा. या सगळ्या गोष्टींसाठीच त्याला वेळ पुरायचा नाही तर मुलींकडे पाहणंच सोडा. पण या सगळ्यात त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू मुलगी आवडू लागली होती. स्नेहाच्या प्रेमात तो कसा पडला हे त्याचं तोही सांगू शकत नव्हता. पण त्याला स्नेहा आवडू लागली होती हे मात्र नक्की. स्नेहा आणि प्रसेन एकाच वर्गात होते. तिच्याशी मैत्री करावी म्हणून कित्येक महिन्यांनी प्रसेनने वर्गाचं तोंड पाहिलं होतं. आता तो तिच्यासाठी का होईना वर्गात बसू लागला होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. तिच्या सांगण्यावरुन तो अभ्यासही करु लागला होता. त्याचं कट्ट्यावर बसणं कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालं नव्हतं. स्नेहालाही त्याचा तो रावडी स्वभावच आवडला होता. चांगल्या मुलींना नेहमी रावडी मुलं का पसंत पडतात हा प्रश्न त्यांच्या आजूबाजूच्यांनाही पडला होता. पण या दोघांना त्याची काही पर्वा नव्हती. हे दोघंही एकमेकांची कंपनी चांगली एन्जॉय करत होते. बघता बघता फायनल इयरची परीक्षाही जवळ येऊन ठेपली होती. परीक्षेला काही महिनेच राहिले असताना प्रसेनला काविळ आणि टायफॉईड झाला. या आजारात प्रसेन फारच कृष झाला होता. डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. १५-२० दिवस रुग्णालयात गेल्यामुळे तो फार थकला होता. घरी आल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले. या दरम्यान त्याने स्नेहाला अनेक फोन करण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण स्नेहाने त्याच्या कोणत्याच कॉलचे उत्तर दिले नाही. आपण असे नेमके काय केले की स्नेहा रागवली? या प्रश्नाचे उत्तर तो आपल्यापरिने शोधत होता. पण तरीही त्याला त्याचे उत्तर मिळाले नव्हते. प्रिलिमदरम्यान त्याने स्नेहाला कॉलेज बाहेर गाठले आणि थेट विचारले, ‘नक्की झालंय काय स्नेहा? तू अशी का वागतेस?… किमान मला तरी कळू दे…’ यावर स्नेहाने ‘मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. प्लीज मला कॉल करु नकोस मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करु दे…’ अभ्यासाच्या ताणामुळे कदाचित स्नेहा अशी वागत असेल असे प्रसेनला सुरूवातीला वाटले. परीक्षेनंतर सगळे नीट होईल या आशेवर त्याने प्रिलीमचा तो वेळ जाऊ दिला.
प्रिलीमनंतर त्याने पुन्हा तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. प्रिलिमनंतर कॉलेजमध्ये जाणं बंद होत असल्यामुळे त्यांचं भेटणंही बंद झालं होतं. प्रसेनच्या मनातून तिचा विचार काही केल्या जात नव्हता. असं काय झालं असेल की ती माझा एवढा राग करायला लागली या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं. आधीच आजारपणामुळे तब्येत खराब झाली असताना त्याच्या डोक्यात सतत हेच विचार असल्यामुळे त्याची तब्येत जास्तीच खराब होत चालली होती. पर्यायाने त्याला बी.कॉमच्या फायनल एक्झामला मुकावे लागले होते. प्रिलिमच्या परीक्षेनंतर स्नेहा त्याला कधीच भेटली नाही आणि तिने अचानक बोलणं का टाकलं? तिने काहीही कारण न देता नातं का तोडलं? या प्रश्नांची उत्तरं त्याला शेवटपर्यंत मिळाली नाहीत.
स्नेहाच्या त्या धक्यातून सावरायला प्रसेनला बरीच वर्षे लागली. या मधल्या काळात त्याच्या आणखीही गर्लफ्रेण्ड झाल्या पण आजही स्नेहा तसं का वागली हा प्रश्न त्याला सतावतो. प्रसेन आजही स्नेहामध्येच गुंतला आहे असं नाही. तो केव्हाच पुढे निघून गेला पण निरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात. प्रसेनच्या बाबतीतही तेच झाले. रुपालीचे मन दुखावले तेव्हा प्रसेनला त्या गोष्टीची जाणीव नव्हती. पण जेव्हा स्वतःचेच मन दुखले गेले तेव्हा त्याला रुपालीचं दुःख सर्वार्थाने कळलं. त्यामुळेच जेव्हा जेव्हा रुपालीचा विषय निघतो तेव्हा प्रसेनला स्नेहा आठवते आणि स्नेहाची आठवण झाली की रुपालीचं ते दुःख त्याच्या समोर येतं.